सांगली : महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिचे तिसऱ्यांदा लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीतील दोघांचे जामीन अर्ज तर तिघांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय गौड यांनी फेटाळून लावला.पिडीत महिलेने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयित वर्षा बजरंग जाधव, तिचा पती बजरंग शिवाजी जाधव, मुलगा विश्वजित जाधव (सर्व रा. सुलतानगादे, ता. खानापूर) तिचा भाऊ शंकर बाबूराव थोरात (रा. वसंतगड, ता. कऱ्हाड) व एजंट संगीता संजय काळे (रा. टाकवडे रोड, इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.पिडितेच्या पतीचे निधन झाले आहे. ती काम मिळवण्यासाठी संशयितांकडे गेली होती. तिला एका मुलाशी लग्न करायचे आहे, दरमहा ५० हजार रुपये मिळवून देतो, असे सांगण्यात आले. पिडिताने त्याला नकार दिला. तरीही संशयिताने तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. वराकडून संशयितांनी पैसे उकळले. पिडिता दुसऱ्या धर्मातील असल्याचे कळताच तिच्या पतीने तिला संशयितांच्या घरी आणून सोडले.त्यानंतर या टोळीने तिचे नाव, पत्ता बदलून खोटे आधारकार्ड बनविले. कऱ्हाड येथील एका तरुणाशी तिचे लग्न लावून दिले. त्या तरुणानेही पिडीताला संशयितांकडे आणून सोडले. त्यानंतर या टोळीने तिचे तिसऱ्यांदा लग्नासाठी जबरदस्ती सुरू केली. पिडिताने नकार दिला असता तिला मोटारीत बसवून घेऊन जात असताना तिने आरडाओरडा केला. रस्त्यावरील लोकांनी गाडी अडवून संशयितांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.या टोळीवर कुरूंदवाड, विटा, कऱ्हाड याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी वर्षा जाधव व तिचा भाऊ शंकर थोरात या दोघांना अटक केली होती. तर वर्षाचा पती, मुलगा व एजंट महिला फरार आहेत. अटकेतील दोघांनी जामिनासाठी व पसार तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने संशयिताचा जामिन फेटाळून लावला. सरकारी पक्षातर्फे ॲड. रियाज जमादार यांनी युक्तीवाद केला.
खोटी लग्ने लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा जामीन फेटाळला
By शीतल पाटील | Published: June 19, 2023 6:41 PM