सांगली : शहरातील सिव्हील चौक ते बसस्थानक मार्गावर धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून साहेबराव किरमल खैरावकर (वय २१, रा. मार्केट यार्ड,सांगली) व श्रेयस अश्विन शहा (वय २१, रा. कॉलेज कॉर्नरजवळ, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
रोहन रामचंद्र नाईक (वय २९, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभर फुटी रोड, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मुख्य संशयिताचा शोध सुरू असून, एका खूनप्रकरणी कारागृहात असलेला हा संशयित बारावी परीक्षा देण्यासाठी जामिनावर बाहेर होता. यात त्याने रोहनचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील शंभरफुटी रोडवर रोहन नाईक राहण्यास होता. तो पेंटिंगचे काम करत होता. मंगळवारी रंगपंचमी असल्याने त्याने कामातून सुटी घेतली होती. दुपारी तो मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्याच्यात वाद झाला होता. वादावादी वाढल्याने दोन्ही गट समोर आले होते. मात्र, हा वाद मिटविण्यात आला होता.
मंगळवारी सायंकाळी एका बारमध्ये पुन्हा एकदा हे दोन्ही गट समोरासमोर आले होते. त्यांच्यात पुन्हा वाद झाल्यानंतर तिथे पुन्हा तो मिटविण्यात आला. त्यानंतर मृत रोहन आपल्या मित्रांसह तिथून बाहेर आला व सिव्हिल चौकाकडे येत होते. यावेळी सहा संशयितांनी त्याचा पाठलाग करत तो पळून जात असतानाच, एकाने धारदार हत्याराने रोहनच्या पाठीत वार केला. यात तो खाली कोसळला व जागीच ठार झाला.
या खून प्रकरणातील मुख्य संशयिताचा पोलिसांकडून अद्यापही शोध सुरू आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात तो कारागृहात होता. बारावीची परीक्षा देण्यासाठी त्याला तात्पुरता जामीन मिळाल्याने तो बाहेर होता. त्या कालावधीत त्याने रोहनवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत यातील दाेघांना अटक केली आहे.