इस्लामपूर : गेल्या ५६ वर्षांत अनेक सेना आल्या आणि संपल्या. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून उभा केलेली शिवसेना कधीही संपणार नाही. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत शिवसेनेच्या नेत्यांवर हे सरकार गुन्हे दाखल करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केला.येथील तहसील कचेरी परिसरातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अरुण दुधवडकर, मंगेश शिंदे, जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, संजय विभूते, तालुका प्रमुख गजानन पाटील, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे उपस्थित होत्या.रावते म्हणाले, कायद्याचा आधार घेत चिन्ह आणि नाव गोठवले. मात्र, विचार गोठले जाऊ शकत नाहीत. सामान्य शिवसैनिकाची ताकद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. इथल्या गद्दाराला अनेक वर्षे ताकद दिली. निधी दिला, विश्वास दिला. त्या विश्वासघातकी गद्दाराला कायमचा धडा शिकवा.अभिजित पाटील म्हणाले, आनंदराव पवार यांनी शिवसेनेचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून वापर केला. शिवसैनिकांचे आणि पक्षाचे स्वत:च्या स्वार्थासाठी खच्चीकरण केले. त्यामुळे वाळवा, शिराळा तालुक्यात शिवसेना वाढली नाही. आमच्यासारख्या सक्रिय कार्यकर्त्याला संघटनात्मक गटबाजीतून बाजूला ठेवण्यात आले. यापुढे तरुण शिवसैनिकांची नवीन फळी घेऊन जनतेशी सेवा करू.गजानन पाटील यांनी शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामकाजाची माहिती दिली. सुजाता इंगळे, युवा सेनेचे विनायक गोंदील, प्रदीप माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बजरंग पाटील, शंभूराज काटकर, सुभाष मोहिते, महादेव मगदूम, पोपट भानुसे, तानाजी सातुपते, मानव गवंडी, उदयसिंह सरनोबत, योजना पाटील, चंद्रकांत मैंगुरे, मयूर घोडके उपस्थित होते.
"५६ वर्षांत अनेक सेना आल्या आणि संपल्या, ठाकरेंची शिवसेना संपणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 3:49 PM