वारणा खोऱ्यात काकांची धाडसी व दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून वेगळी ओळख होती. वयाच्या अठराव्यावर्षी सातारा लोकल बोर्डाची निवडणूक लढवून माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पॅनेलमधून विजयी झाले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे, बॅ. जी. डी. पाटील, खा. एस. डी. पाटील, छगनबापू पाटील, एम. डी. पवार साहेब यांच्याशी त्यांचे राजकीय मैत्रीपूर्ण संबंध होते. तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री व माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिगाव (ता. वाळवा) येथे ‘अखिल भारतीय काँग्रेस चिरायू होवो’ ही घोषणा देऊन वारणा शेतकरी परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीवरील भव्य पुलाच्या मागणीचा ठराव केला. बाळासाहेब देसाई यांच्याकडे आग्रही भूमिका घेऊन ताे लोकल बोर्डातून मंजूर करून घेतला. आष्टा-शिगाव खडीचा रस्ता मंजूर करून घेतला. १९७२ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत आपल्या विहिरीवरून पाण्याचे हौद बांधून गावाला पिण्याचे पाणी स्वखर्चाने खुले केले. वारणा साखर कारखान्याच्या माध्यमातून व लोकल बोर्डाच्या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. काकांचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. गावातील गोरगरीब सर्व समाजातील लोकांना काकांनी कायम मदतीचा हात दिला. १९६२ मध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवारी तिकीट यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील यांनी काकांना काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर केले होते. मात्र काकांनी मोठ्या मनाने ज्येष्ठ नेते विलासराव शिंदे यांना तिकीट देऊन सहकार्य केले.
चांदोली धरण होण्याच्या आधी शिगाव येथील वारणा नदीवर शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर टाईप (केटी वेअर) मजबूत धरण उभारण्यात तात्यासाहेब कोरे व काकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. रघुनाथ श्रीपती पाटील, रामचंद्र वायचळ, गणपतराव चव्हाण, भीमराव पाटील, विठ्ठल गांधी, सरपंच आनंदराव पाटील, ज्ञानू बांडे (गुरुजी), बळवंत देसाई, मुबारक इनामदार, रामचंद्र देसाई, रघुनाथ पाटील हे काकांचे गावातील विकास कामांतील जुने सहकारी होते. काकांनी गावात अनेक सामाजिक संस्थांची उभारणी केली. काकांचा पंचक्रोशीत वेगळा दरारा होता. काकांच्या पश्चात आज त्यांच्या मुलांनी व सर्व कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचा वारसा उत्तमपणे सुरू ठेवला आहे. काकांच्या नावाने गावांमध्ये विविध संस्था, शिक्षण संस्था स्थापन करून त्या उत्तमप्रकारे चालविल्या आहेत. आज काकांचा स्मृतिदिन... त्यांना कोटी कोटी प्रणाम!
संकलन : प्रा. तानाजी बांडे
शब्दांकन : विनोद पाटील
फाेटाे : १६ बाळकृष्ण पाटील