कडेगाव : महाराष्ट्र शासनाने बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी बैलगाड्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार अर्चना शेटे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. ‘पेटा हटाव, बैल बचाव’, ‘बैलगाडी शर्यत सुरु झालीच पाहिजे’, ‘आवाज दो हम एक है’, ‘शेतकरी बांधवांचा विजय असो’ अशा घोषणा यावेळी बैलगाडी मालक शेतकऱ्यांनी दिल्या. २०१४ पासून बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. मुळात बैलगाडी शर्यत हा एक खेळ आहे. बैलगाडी शर्यतीत शेतकरी बांधव बैलगाडी घेऊन सहभागी होतात. प्रेमाने बैलांची जोपासना व संगोपन करतात. त्यामुळे बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे तालुकाप्रमुख हेमंत करांडे यांनी केली. सरकारने आमची मागणी मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवाजी नांगरे आणि धनाजी शिंदे यांनी दिला.यावेळी बैलगाडी मालक शेतकरी पहेलवान कुलदीप रास्कर, शंकर करांडे, राहुल रास्कर, धनाजी शिंदे, हणमंत बोडरे, नीलेश नांगरे, सुनील मोहिते, व्यंकटराव देशमुख, विजय चव्हाण, राहुल चन्ने, शिवाजी नांगरे, मनोहर मदने, सुहास पाटील, समाधान भिसे, आनंदराव शिंदे, सुनील घोलप, उपस्थित होते. (वार्ताहर)
कडेगाव तहसीलवर बैलगाडी मोर्चा
By admin | Published: January 24, 2017 11:40 PM