सांगली : कोरोनामुळे सुरू झालेल्या दीर्घकालीन संचारबंदीने आता नागरिकांना बहुतांश व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करण्यास भाग पाडले आहे. घरपोहोच भाजीपाला, साहित्य पुरवठा सेवा, औषधे, तक्रारी, माहिती, बँकिंगचे व्यवहार, गॅसचे बुकिंग अशा प्रत्येक प्रकारच्या गोष्टी मोबाईल व संगणकीय इंटरनेटद्वारे केल्या जात आहेत. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही स्तरावर अशाप्रकारचा आॅनलाईन व्यवहार कित्येक पटीने वाढला आहे.आधुनिक युगातही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तरुण पिढीमार्फत आॅनलाईन पद्धतीने वस्तू घरी मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही संचारबंदीत आता कंपन्यांचे व्यवहार बंद पडले आहेत. कुरिअर सेवाही ठप्प आहे.
बाजार व सर्व प्रकारचे व्यवहार थांबले आहेत. अशावेळी घरात बसूनच सर्व गोष्टींची तजवीज कशी करायची, असा प्रश्न संचारबंदीच्या सुरुवातीच्या दिवसात नागरिकांना सतावत होता. आता आॅनलाईन व्यवहारांनीच त्यासाठीचा मार्ग शोधून दिला आहे. घरपोहोच सेवा सुरू झाल्यानंतर त्यांची मागणी आॅनलाईन म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून नोंदविली जाते. त्यानंतर घरपोहोच सेवा पुरविण्यात येत आहे.भाजीपाला, किराणा माल, औषधे अशा अत्यावश्यक गोष्टींकरिता आॅनलाईन व घरपोहोच सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे याचा लाभ आता नागरिक घेत आहेत. बँकिंगचे व्यवहारही आॅनलाईन केले जात आहेत. पैसे काढणे, दुसऱ्याच्या खात्यावर टाकणे, खात्याचे स्टेटमेंट काढणे, आॅनलाईन अपडेशन अशा अनेक गोष्टी करता येत आहेत.