सांगली : वाळवा तालुक्यातील चार गावांमध्ये लम्पी त्वचारोग बाधित जनावरांची संख्या १० इतकी आहे. लम्पी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील जनावर बाजार आणि बैलगाडी शर्यतीवर शुक्रवारपासून बंदी घातली आहे.
डॉ. दयानिधी म्हणाले की, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. शेतकरी व गोपालक यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची आणि जनावरांची वाहतूक करण्यास मनाई केली आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्येही जनावरांची खरेदी- विक्री व प्रदर्शन होत असल्यास, त्यालाही बंदी केली आहे. बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास सक्त मनाई केली आहे. हा आदेश दि. १२ सप्टेंबर ते दि. ११ ऑक्टोंबर २०२२ रोजीपर्यंत अंमलात राहील. या कायद्याचे पालन न केल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले, लम्पी रोगाबाबत जनजागृती आवश्यक आहे. लम्पीचा धोका मोठा असला तरी आपल्याकडे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या रोगाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत वाळवा, शिराळा तालुक्यांतील बैलगाडी शैर्यतीवर बंदी राहणार आहे. जर कोणी अशी शर्यत घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. डॉ. सचिन वंजारी म्हणाले, हा आजार कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होतो. या आजारात जनावरांच्या अंगावर गांधील उठणे, त्यात स्त्राव निर्माण होणे, ताप येणे, खाणे-पिणे बंद होणे, कासेवर सूज येणे आणि तोंडावर चट्टे येणे अशी लक्षणे दिसून येतात. डॉ. संजय पवार म्हणाले, ९६ पैकी शेखरवाडी (६), चिकुर्डे आणि ऐतवडे खुर्द (प्रत्येकी १), डोंगरवाडी (२) अशा चार गावांत लम्पीबाधित १० जनावरे आढळून आली आहेत. राजारामबापू आणि वारणा दूध संघानेही लम्पी आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण आणि इतर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय पातळीवर तालुक्यातील जनावरांच्या लसीकणासाठी नियोजन केले आहे.सहा जनावरांचे अहवाल लम्पी पॉझिटिव्हचिकुर्डे, शेखरवाडीमधील सहा जनावरांचे पुणे प्रयोगशाळेकडे पाठविलेले अहवाल लम्पी त्वचा रोग (लम्पी स्कीन डिसीज) पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाने तातडीने या परिसरातील तीन हजार ९०० जनावरांची लसीकरण पूर्ण केले आहे. तसेच गुरुवारी १० हजार लसींचे डोस जिल्ह्यासाठी शासनाकडून उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी वाळवा तालुक्यातील डोंगरवाडीत आणखी दोन लम्पी त्वचा रोगाची जनावरे सापडली आहेत.जिल्ह्यात सर्वेक्षण पशुसंवर्धनेचे अधिकारी लम्पी त्वचारोगाचे जनवारांचा शोध घेत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांंनी संयुक्तपणे जिल्ह्यात पशुधनाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. जिल्ह्यात जनावरे आजारी आहेत का ? याचीही ते माहिती घेत आहेत.