सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने व अनेक घटना घुसडून दाखविण्यात आल्याने ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी मावळा महासंघाने शनिवारी केली. या चित्रपटाविरोधात महासंघाने निर्माता सुनील फडतरे यांच्या सांगलीतील घरासमोर निदर्शने केली.सांगलीतील चित्रपट निर्माते सुनील फडतरे यांच्या नेमिनाथनगर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मावळा महासंघाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याने आम्ही चित्रपटाचे लेखक, निर्माता व सर्व कलाकारांचा निषेध करीत आहोत. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठ्यांच्या इतिहासाची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली आहेत.
चित्रपटात दाखविल्याप्रमाणे बाजीप्रभू व छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कोणती लढाई झाली होती? ज्या गोष्टींचा इतिहासात उल्लेखच नाही, अशा गोष्टी चित्रपटात धडधडीत खऱ्या म्हणून दाखविण्याचे धाडस कसे होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.आंदोलनात कविता पुणेकर, पौर्णिमा पाटील, प्रशांत भोसले, चंद्रशेखर पाटील, पै. अमित पवार, रोहित पवार, आदी उपस्थित होते.चित्रपट शिवप्रेमींनी पाहू नये!छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणारा व विकृतीकरण करणारा हा चित्रपट कोणत्याही शिवप्रेमीने पाहू नये, असे आवाहन महासंघाने केले आहे. या चित्रपटाविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.