आष्टा : कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर यांच्या वतीने आष्टा येथील उपबाजारात केळीचे सौदे सुरू करण्यात येणार आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवार, दि. २३ रोजी सकाळी ९ वाजता केळी सौदे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अल्लाउद्दीन चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य, फळे, भाजीपाला यांना बाजार भाव मिळावा या दृष्टिकोनातून इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्नशील आहे. माजी आ. विलासराव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा शहरात हळद उपबाजार सुरू करण्यात आला. या ठिकाणी सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी हळद पाठवून देत आहेत. प्रत्येक रविवारी या ठिकाणी हळदीचे सौदे होत आहेत.
सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. मात्र, या केळीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध नाही. याचा विचार करून आष्टा येथे केळीचे साैदे सुरू केले आहेत. या सौद्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चौगुले यांनी केले आहे.
यावेळी बाळासाहेब इंगळे, दत्तात्रय मस्के, बाजीराव पाटील, विजय जाधव यांच्यासह बाजार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.