दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेचा ठेका देताना, विशेष ठराव घेण्यात आला. त्यानुसार समितीकडून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यापूर्वी अटी आणि शर्ती ठरवून, ठेकेदाराच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली. मात्र अद्याप अटी आणि शर्तीच ठरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काम झाले नसतानादेखील, ठेक्यानुसार बिल देण्यातआले. सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांची ठेकेदारावर मेहरनजर असल्यामुळे विशेष समितीच्या मलमपट्टीने उधळपट्टी झाली आहे.
पारदर्शक कारभाराची ग्वाही देत पालिकेत भाजपचे कारभारी सत्तेत आले. सत्ताधाºयांचा कारभार सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच स्वच्छतेच्या ठेक्यात बदल झाला. २००७ पासून असलेला बीव्हीजीकडील स्वच्छतेचा ठेका काढून घेण्यात आला. त्याऐवजी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला तो देण्यात आला. सर्वात कमी दराची निविदा हीच होती. सत्ताधाºयांनी २० जूनरोजी ठेक्याबाबत अटी आणि शर्ती ठरवण्यासाठी विशेष समिती नेमली. तिच्याकडून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यापूर्वी कामाबाबतच्या अटी आणि शर्ती ठरवून देण्याचा निर्णय झाला. यानुसार समितीने दिलेल्या अटी आणि शर्तीनुसारकाम करणे अपेक्षित होते.
या ठरावानुसार ठेकेदाराकडून करारपत्र करुन वर्कआॅर्डर देण्याचाही निर्णय झाला होता. मात्र ठेका देऊन सात महिने होत आले, तरीदेखील अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या नाहीत. समितीतील सदस्यांनी देखरेख करुन वेळोवेळी पालिकेला न झालेल्या कामाबद्दल सूचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र सूचना तर दूरच, अटी आणि शर्तीच सादर केल्या नसल्याचे उघड झाले आहे.दरम्यान, ठेकेदाराने १ जुलैपासून शहरातील स्वच्छतेचे काम सुरू केले. तेव्हापासून त्याच्या मर्जीनुसारच काम सुरू आहे. त्याच्यावर विशेष मर्जी असणाºया एका नगरसेवकाच्या वरदहस्तामुळे, समिती नामधारी राहिली. न केलेल्या कामाचे बिल देण्यात आले.३४ लाखांचा चुराडा१ जुलैपासून पाच महिन्यांचे बिल ठेकेदाराला देण्यात आले आहे. ठेक्यातील तदतुदीनुसार दहा टक्के रकमेची कपात पालिकेकडून करणे अपेक्षित होते. मात्र समितीकडून अटी आणि शर्ती मिळाल्या नसल्याने प्रशासनाकडून ठेक्याच्या १८ टक्के रक्कम अनामत म्हणून कापून घेण्यात आली होती. ठेकेदाराला आतापर्यंत पाच महिन्यांच्या बिलापोटी ३४ लाख ४८ हजार ९५५ रुपयांचे बिल देण्यात आले आहे.अशी आहे विशेष समिती...नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, पक्षप्रतोद अनिल कुत्ते, तत्कालीन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूनम सूर्यवंशी, तत्कालीन स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती मंगल मानकर, नगरसेवक दत्तात्रय रेंदाळकर आणि नगरसेवक अॅड. सचिन गुजर.