लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या संगतीने किसान आत्मनिर्भर यात्रा काढली, विरोधकांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यावर तोंडसुख घेतले आणि कडकनाथ कोंबड्याने पुन्हा बांग दिली. त्यानंतर आता ‘कडकनाथ’च्या घोटाळेबहाद्दरांना वाचवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झारीतील शुक्राचार्याला शेट्टी उघडे पडणार का, ‘सेटलमेंट’ चव्हाट्यावर येणार का, अशा सवालांना जिभा फुटू लागल्या आहेत.
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीने हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी कायद्याच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रेची ‘टूम’ काढली. येडेमच्छिंद्र येथे यात्रेच्या प्रारंभीच राजू शेट्टी यांच्यावर तोफा डागल्या. मग शेट्टी तरी मागे राहतील का? त्यांनी त्याच ठिकाणी सभा घेऊन सदाभाऊंची दुखरी नस दाबली. साडेपाचशे कोटीच्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात संशयाची सुई सदाभाऊ खोत आणि त्यांचा मुलगा सागर यांच्याकडे आहे. आत्मनिर्भर यात्रेच्या सांगतेवेळी कोंबड्या भिरकावण्याचा इशारा देणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली. हाच मुद्दा घेऊन शेट्टी बोलले की, घोटाळेबहाद्दर मोकाट फिरत आहेत, पण कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात आहे. पोलिसांना तसा इशारा देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झारीतील शुक्राचार्याला शोधणार आहे.
‘कडकनाथ’चा घोटाळा उघड झाल्यापासून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याऐवजी नेत्यांची खडाखडीच पाहावी लागत आहे. यानिमित्ताने खोत यांना पेचात पकडण्याची संधी त्यांच्या विरोधकांना मिळाली होती. पण त्याआधीच वेगळी ‘सेटलमेंट’ झाली होती...
या घोटाळ्याची सूत्रे जेथून हलली आणि सर्वाधिक झळ जेथे बसली, त्या इस्लामपूर परिसराचे आमदार, तथा विद्यमान जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घोटाळ्यावर अवाक्षरही काढलेले नाही. किंबहुना या मुद्द्यावर रान पेटवण्याऐवजी त्याला बगल दिली. मोघम उत्तरे दिली. शिवाय सदाभाऊ खोत राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘टार्गेट’ करत असताना जयंत पाटलांवर मात्र घसरत नाहीत, तर पाटीलही खोत यांच्याबाबत ‘संयम’ दाखवत काहीही बोलत नाहीत.
विधानसभा निवडणुकीआधी नगराध्यक्ष तथा भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील आणि खोत यांच्यातील वाद उफाळला. निशिकांत पाटील यांचे तिकीट कापून भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली. खोत यांनीच गौरव नायकवडींना शिवसेनेची उमेदवारी देण्यास भाग पाडले. दोन वर्षे तयारी केलेल्या निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. जयंत पाटील यांच्या विरोधकांत नेहमीप्रमाणे फूट पडली आणि त्यांचा निवडून येण्याचा मार्ग सुकर झाला. विरोधकांतील ही फूट आजही कायम आहे. हा होता ‘सेटलमेंट’ दुसरा अध्याय!
आता शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर घोटाळेबहाद्दरांना वाचविणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झारीतील शुक्राचार्य खरेच उघडे पडणार का, ‘सेटलमेंट’ चव्हाट्यावर येणार का, असे सवाल समोर येत आहेत. शक्यता कमीच, कारण त्याच शुक्राचार्यांच्या मांडीला मांडी लावून शेट्टी बसत आहेत.
चौकट
पवारांवरील टीकेनंतरही जयंत पाटील यांची चुप्पी!
किसान आत्मनिर्भर यात्रेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटील यांची पत्रकार परिषद आणि जाहीर सभा झाली. मात्र त्यांनी खोतांच्या टीकेला उत्तर दिले नाही. खोत त्यांना पुन्हा ‘अदखलपात्र’ वाटले असावेत. उलट निशिकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. गोलमाल है भाई, सब गोलमाल है!