सांगली /मिरज : सांगलीत कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या कुंटणखानाचालक महिलेच्या बहिणीचा बोगस जन्मदाखला बनविणाऱ्या मिरजेतील दोघा एजंटांना मदत करणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माउली पाटील या महापालिका कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडी दिली आहे.सांगलीत गोकुळनगरात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीच्या विक्रीप्रकरणी कुंटणखानाचालक अफसाना ऊर्फ कामिनी उमर फारूक शेख, तिची बहीण मुन्नी शेख व मुन्नीचा साथीदार इस्माईल जमादार यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मुन्नी शेख ही बांगलादेशी महिला गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळनगरमध्ये वास्तव्यास आहे. तिचा सांगलीत बोगस जन्मदाखला तयार करण्यात आला होता. मिरजेत एजंट म्हणून काम करणारे अब्दुल कादर ऊर्फ तोफिक गुलमोहम्मद मुजावर आणि मुजम्मिल मुल्ला या दोघांनी महापालिकेच्या माऊली पाटील कर्मचाऱ्याच्या मदतीने मुन्नीचा बोगस जन्मदाखला तयार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ताैफिक व मुजम्मिल या दोघांना अटक झाल्यानंतर महापालिका कर्मचारी माउली पाटील हा फरार झाला होता. शोध घेऊन पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने पाटील यास दि. २४ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. माउली पाटील याने अन्य किती बांगलादेशींना बोगस जन्मदाखले दिले आहेत याची पोलिस चाैकशी करीत आहेत.
बांगलादेशी महिलेचा बोगस जन्मदाखला; सांगली महापालिका कर्मचाऱ्याला अटक
By शीतल पाटील | Published: March 21, 2023 4:17 PM