सांगली : सांगलीवाडीत भिशीत जमा झालेल्या पैशाच्या जोरावर सावकारीचा व्यवसाय करून वसुलीसाठी लोकांच्या मालमत्ता बळकावणार्या राजीव पंडित पाटील (वय ४३, रा. नवयुवक चौक, सांगलीवाडी) या सावकारास गुप्त वार्ता पथकाने आज (मंगळवार) सकाळी अटक केली. त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली. यामध्ये लोकांच्या मालमत्ता जबरदस्तीने बळकावून त्या स्वत:च्या नावावर करून घेतलेले २९ दस्तऐवज हाती लागले. याशिवाय व्याजाने पैसे दिलेल्या लोकांच्या नावांची नोंद असलेली सात ते आठ रजिस्टर, करारपत्र, वटमुखत्यारपत्र, मुदतठेव पावत्या, बँकेचे पासबुक, धनादेश जप्त करण्यात आले आहे. सांगलीवाडीतील रंजना पाटील यांचे पती पंडित पाटील यांनी २००६ मध्ये राजीवकडून पाच टक्के व्याजाने ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. या रकमेची त्यांनी व्याजासह परतफेड केली होती. तरीही राजीवने, अद्याप तुम्ही दोन लाख रुपये द्यावे लागतात, असे सांगून वसुलीसाठी तगादा लावला होता. पंडित यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी राजीवने त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जबरदस्तीने नेऊन त्यांचे राहते घर स्वत:च्या नावावर करून घेतले. त्यानंतर राजीवने त्यांना त्यांच्याच घरात भाडेकरू म्हणून ठेवले. घर नावावर करूनही राजीवने अद्यापही पैसे देणे लागतात. ते द्या, नाही तर घर खाली करा, अशी धमकी दिली होती. त्याच्या धमकीला व जुलमी वसुलीला कंटाळून पंडित यांनी २० एप्रिल २०११ मध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकारानंतर राजीवने मृत पंडित यांची पत्नी रंजना यांची भेट घेऊन ‘तुमच्या पतीने माझ्याकडून ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासह दोन लाख रुपये देणे लागतात. ते द्या, नाही तर घर खाली करा, यासाठी तगादा लावला. यामुळे रंजना यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेऊन तक्रार केली. सावंत यांनी गुप्त वार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना चौकशीचे आदेश दिले होते. कुरुंदकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यावेळी राजीव पाटील हा त्याच्या श्रीगणेश नावाच्या भिशीत जमा झालेल्या पैशांवर सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन घरावर छापा टाकून ही कारवाई पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)
सांगलीवाडीतील सावकारास अटक भिशीतून सावकारी : घरावर छापा; २९ दस्तऐवज जप्त
By admin | Published: May 14, 2014 12:03 AM