सांगली : सर्व्हर डाउनमुळे दस्त नोंदणी उपनिबंधक कार्यालयासह बँका, पतसंस्थांचे वारंवार कामकाज ठप्प होत आहे. शासनाच्या ऑनलाइन योजनेचाच जिल्ह्यात फज्जा उडाल्याबद्दलची लेखी तक्रार शिक्षण संस्था संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी राज्य शासनाकडे केली आहे. शिक्षणावरही परिणाम होत असून, यामध्ये शासनाने गांभीर्याने लक्ष घालून व्यवस्था सुरळीत करण्याची गरज आहे.निवेदनात म्हटले की, राज्याचे प्रशासकीय कामकाज गतिमान होऊन जनतेची कामे विनात्रास वेळेत व्हावीत, यासाठी शासकीय कामात संगणगीकरणावर भर दिला आहे. जनतेची कामे वेळेत होण्यासाठी विविध कार्यालयांत जनतेची सनद या सदराखाली जो फलक प्रदर्शित केला आहे त्याप्रमाणे आजही वेळेत जनतेला सुविधा उपलब्ध होत नाहीत. याचे प्रमुख कारण संगणकावर वारंवार सर्व्हर डाउन हे दिले जाते.नोंदणी उपनिबंधक कार्यालयातील सर्व्हर डाउन झाल्यामुळे दि. १७ फेब्रुवारीला तीन तास कामकाज ठप्प झाले होते. परगावाहून आलेल्या अनेक लोकांना सर्व्हर डाउनचा फटका बसला. बँका, पतसंस्था, सहकारी संस्था, शिक्षण क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, विद्यार्थी, पालक यांनाही परीक्षा फार्म भरणे, शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्र व पडताळणी, विविध शासकीय कार्यालयांतील दाखले मिळविणे, आदी कामातही सर्व्हर डाऊन हा प्रश्न डोकेदुखी झाला आहे.आयटी सेलमधील तज्ज्ञांची शासनाने तातडीने बैठक घेऊन सर्व्हर डाउन ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली आहे.
'सर्व्हर डाउन'मुळे बँका, पतसंस्था, नोंदणी अधीक्षकांचे कामकाज ठप्प, ऑनलाइनचा सांगली जिल्ह्यात उडाला फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 7:09 PM