संख : लॉकडाऊनमुळे जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे. सध्या द्राक्षाला प्रतिकिलो केवळ ८ ते १४ रुपये नीचांकी दर मिळत आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कवडीमोल भावाने द्राक्षे विकावी लागत आहेत.
पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, करेवाडी, कागनरी परिसरात द्राक्ष बागांची नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मागास छाटणी घेतात. या सर्व द्राक्षेबागांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसाठी घेतले जाते. एप्रिल-मे महिन्यात विक्री केली जाते. बाजारात हंगाम संपत आलेला असतो, मागणी चांगली असते, दर चांगला मिळतो. गेल्यावर्षी मे महिन्यात ४० ते ५० रुपये किलो भाव मिळाला होता. एप्रिल-मे महिन्यात विक्री करण्यासाठी येणाºया बागांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. महागडी औषधे, रासायनिक खत, मजुरी, मशागतीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. यावर्षी अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले आहे.
परंतु कोरोनाच्या संकटामुळे बाजारात दर कमी झाला आहे. बाजारपेठा बंद असल्याने व्यापारीही आलेले नाहीत. संचारबंदीने विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी बेदाण्याकडे वळला आहे. परंतु सर्व बेदाणा शेड मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. परिणामी कमी किमतीला बागा विकाव्या लागत आहेत. सध्या ८ ते १४ रुपये किलो दराने द्राक्षांची विक्री होत आहे. हा आतापर्यंतचा नीचांकी दर आहे.
द्राक्ष दरावर टाकलेला दृष्टिक्षेप : (प्रतिकिलो)फेब्रुवारी महिन्यातील दर सध्याचा दर३५ ते ३८ रुपये ८ ते १४ रुपये
कोरोनाच्या संकटामुळे द्राक्षांचा दर कमी झाला आहे. मशागतीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. दर परवडतही नाही. परंतु माल बागेत ठेवून काय करायचे. आलेला माल बागेतून जावा, यासाठी कमी दराने विक्री करीत आहे.- अमसिध्द कुंडला खरात, द्राक्ष बागायतदार, भिवर्गी