लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील देशी दारूची दुकाने, वाइन शाॅप, बार दुपारी चारनंतर सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पार्सल घेऊन मोकळी मैदाने, निर्जन रस्ते, नदीच्या घाटावर तळीरामांची मैफल रंगत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असून, या तळीरामांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील दारू दुकानासमोर चारनंतरही गर्दी असते. कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत दारूची विक्री सुरू आहे. पार्सल घेऊन सार्वजनिक ठिकाणासह नदीकाठावरही अनेक जण दारू पिण्यासाठी जमतात. याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे.
चौकट
शेजाऱ्यांना त्रास तक्रार करूनही फायदा नाही
- कृष्णा नदीकाठावरील घाटावर सायंकाळी दारू पिणाऱ्यांची गर्दी होत आहे. दारूच्या बाटल्या नदीपात्रातच टाकल्या जातात. त्यामुळे नदीचे प्रदूषणही वाढत आहे. याला आळा घातला पाहिजे.
- एक नागरिक
- शहरातील मुख्य चौकात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर वाइन शाॅप आहे. दिवसभर तिथे गर्दी असते. विशेषत: महिलांना रस्त्याने जाताना त्रास होतो.
- एक नागरिक
चौकट
तक्रार आली, तर कारवाई करू
शहरात पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू आहे. गस्तीच्या वेळी असा प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाते, तसेच नागरिकांच्या तक्रारी आल्यास निश्चित कारवाई करू.
- अजय सिंदकर, पोलीस निरीक्षक
चौकट
विश्रामबाग परिसरात वाइन शाॅप, बारची संख्या अधिक आहे. या परिसरातील अनेक बार दुपारी चारनंतरही सुरू असतात. बारचे शटर डाऊन असले, तरी बाहेर पार्सलसाठी गर्दी दिसते. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.
चौकट
जुन्या कुपवाड रस्त्यावरील दारू दुकाने चारनंतर सर्रास सुरू असतात. दुकानाबाहेर मद्यपीची गर्दी असते. ग्राहकाला रस्त्यावरच पार्सल दारू दिली जाते.
चौकट
कडक निर्बंधामुळे हाॅटेलमध्ये बसून मद्यपान करण्याची गैरसोय झाली आहे. त्यावर या मद्यपींनी मोकळ्या घरकुलांचा आश्रय घेतला आहे. संजयनगर परिसरातील अनेक घरकुलांत मद्यपींनी अड्डा बनविला आहे.