मिरज : महापालिका प्रशासनाकडून पक्षपाताच्या विरोधासाठी मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी मंगळवारी श्रीकांत चौकात बेमुदत उपोषण सुरू केले. नगरसेवक मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, नगरसेविका नर्गिस सय्यद यांनी, मिरजेत विरोधी नगरसेवकांच्या विकास निधीची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिका प्रशासनाविरुध्द आंदोलन सुरु केले आहे.
प्रभाग क्रमांक सहामध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे. अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. सांडपाणी निचऱ्याअभावी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनपा प्रशासन या प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची राष्टÑवादी नगरसेवकांची तक्रार आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून प्रभाग सहामधील चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे असल्याने येथील नागरी सुविधांवरून राजकारण सुरू आहे.
महापालिकेस राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार आहे. या निधीतून होणाºया विकास कामांपासून प्रभाग सहा वगळल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवक आंदोलनाबाबत ठाम होते. राष्टÑवादीचे नेते मनोज शिंदे, बाळासाहेब व्होनमोरे, प्रमोद इनामदार, शकील पटेल, आझम काझी, जाफर अत्तार, शमशुद्दीन सय्यद यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.