लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील सिद्धार्थनगरनजीक महामार्गाच्या मध्यमागी तब्बल चार महिन्यांपासून खडीचा मोठा ढीग ठेकेदाराने ठेवला आहे. यामुळे वाहनांचे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. हा ढीग त्वरित तेथून हटवावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदार दाद देत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.
बोरगावामधून मलकापूर-पंढरपूर या महामार्ग क्रमांक १९१ च्या चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे. ताकारी ते बोरगावच्या सिद्धार्थनगरपर्यंत ५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी चार महिन्यांपूर्वी साइडपट्टीपासून मध्य भागापर्यंत टाकलेला खडीचा मोठा ढीग आजअखेर तसाच आहे. या ढिगाच्या बाजूला खड्डेही पडले आहेत. येथील अडथळ्याबाबत सूचनाफलकही बाजूला नाही. परिणामी लहान-माेठे अपघात हाेत आहेत. समोरून वाहनाचा प्रकाश पडल्यास हा खडीचा ढीग दिसत नाही. त्यामुळे हा ढीग हटवावा, अशी मागणी होत आहे. यापुढे कोणताही अपघात घडल्यास त्यास ठेकेदारास जबाबदार धरून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.