सांगली : सांगलीचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. बसवराज तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी रात्री राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यात नागपूर शहर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. तेली यांची सांगलीत नियुक्ती देण्यात आली आहे. तर मावळते अधीक्षक दीक्षित गेडाम यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण अद्याप देण्यात आलेले नाही.सन २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावातील आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस पाचोरा (जि. जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे शहर उपायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी वर्धा येथे पाेलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर सध्या ते नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.मावळते अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश नंतर देण्यात येणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. मावळते अधीक्षक गेडाम यांनी सप्टेंबर २०२० मध्ये सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी गैरकारभारावर चांगलाच वचक निर्माण केला होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास त्यांनी विशेष प्राधान्य दिले होते. म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्याकांडाचा तपास, कोरोना कालावधीत मिरजेतील रुग्णालयातील गैरप्रकारासह अन्य आव्हानात्मक गुन्ह्यांचा त्यांनी तपास केला होता.
बदलीचे आदेश प्राप्त झाले असून, नागपूर येथील पदभार दिल्यानंतर लगेच सांगलीत येऊन पदभार स्वीकारणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सांगलीत कार्यकाल संस्मरणीयसांगलीत सूत्रे स्वीकारल्यापासून कोरोनासह अन्य आव्हाने होती. मात्र, पोलीस दलातील प्रत्येक घटकाने केलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम गतीने सुरू झाले. यासह इतर महत्त्वाची कामे झाली यात खूप समाधान असल्याची प्रतिक्रिया मावळते अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.