लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: यंदा साखरेला आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात मागणी असल्याने एकही किलो साखर स्थानिक बाजारपेठेत विकली गेली नाही. यामुळे केंद्र शासनाने ३ हजार ५०० रुपये साखरेची आधारभूत किंमत करावी. तसेच व्यापाऱ्यांनी या किमतीपेक्षा जास्त दराने साखर खरेदीची व्यवस्था करावी, अन्यथा साखर उद्योग कर्ज व व्याजाने अडचणीत येईल, अशी भीती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ५० व्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘प्रचिती’चे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले की, सध्याच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापारी साखर मागत आहेत. त्यामुळे एकही किलो साखर बाजारपेठेत विकली नाही. मात्र, देशात सर्वांत जास्त दराने म्हणजे २ हजार ६६१ रुपये दराने साखर विश्वास कारखान्याने निर्यात केली. त्यास ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच ६० हजार क्विंटल कच्ची साखर व स्पिरीटचे जादा उत्पादन केल्याने ऊस उत्पादकांना पैसे देऊ शकलो.
यावेळी दिनकर पाटील, विजयराव नलवडे, सम्राटसिंह नाईक, विवेक नाईक, सुरेशराव चव्हाण, विश्वास कदम, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, सचिन पाटील, भानुदास पाटील, दिनकर महिंद, विठ्ठल चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व नोटीस वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. आभार हंबीरराव पाटील यांनी मानले.
चाैकट
शिल्लक साखरेमुळे अडचण
गतवर्षीची २.२४ लाख व यंदा ८.०२ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. हीच परिस्थिती सर्वच कारखान्यांची आहे. या शिल्लक साखरेचे कर्ज व व्याज याचा बोजा वाढत आहे. यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून विश्वास साखर कारखान्यामार्फत ऊस रसापासून इथेनॉल निर्मिती व सहवीजनिर्मिती प्रकल्प क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.