लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील डॉ. जयवंत पवार व हणमंत जाधव या युवकांनी बॅटरीवर चालणारी अत्याधुनिक स्वदेशी सायकल बनवली आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या संधीचा उपयोग करून ग्रामीण भागातील युवकांनी तयार केलेली सायकल सर्वांच्या पसंतीला उतरली आहे.
डॉ. जयवंत पवार हे आष्टा येथे औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. देशात व राज्यात कोरोनाचे संकट वाढू लागल्याने सर्व उद्योग बंद होते. वाहनांची वर्दळही कमी झाल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली. अनेक लोक वाहनांऐवजी सायकलवरून फिरू लागले. याचवेळी डॉ. जयवंत पवार, हणमंत जाधव यांना बॅटरीवर चालणारी सायकल बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी यासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे येथून सायकल निर्मितीसाठी लागणारे सुटे भाग, बॅटरी व मोटार यासह सर्व साहित्य उपलब्ध केले. अल्पावधितच प्रदूषणविरहित बॅटरीवर चालणारी सायकल निर्माण केली. स्वदेशी बनावटीच्या या सायकलीची बॅटरी एकावेळी चार्ज केल्यानंतर सुमारे ४० किलोमीटर प्रवास करता येतो. पॅडल मारून तसेच बॅटरीवर ही सायकल चालवता येते. त्यामुळे दम लागत नाही. बॅटरीवरील सायकलमुळे तरुणांचा व्यायामही होत आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषणही टाळता येते. स्वदेशी बनावटीची ही सायकल तरुणांच्या पसंतीला उतरत आहे. आष्टा व पुणे येथे या सायकलची निर्मिती करण्यात येत आहे. लोकांच्या मागणीनुसार सायकल तयार करून देण्यात येत असून, भविष्यात अपंगांसाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल तयार करणार आहोत, असे डॉ. जयवंत पवार यांनी सांगितले.
चौकट
डॉ. जयवंत पवार म्हणाले, स्वदेशी बनावटीची बॅटरीवर चालणारी ही सायकल आहे. पॅडल मारत असताना तसेच ब्रेक दाबल्यावर सेन्सरमुळे बॅटरीचा संपर्क बंद हाेऊन बॅटरीची बचत होते. तसेच डिस्क ब्रेक बसवल्याने गतीवरही नियंत्रण मिळवता येते. रात्रीच्या प्रवासासाठी एलईडी दिव्याची सोय केलेली आहे.
फोटो : ०५ आष्टा १
ओळ : आष्टा येथील डॉ. जयवंत पवार बॅटरीवरील सायकलसह.