वारणावती : राज्यातील सर्व कुटुंबियांना समान पाणी वाटप करून सुखी-समृद्धी जीवनाचे, पर्यावरण संतुलित विकासाचे धोरण म्हणजेच ‘महात्मा फुले व्हिजन’ होय. जोपर्यंत हे राज्यभर लागू होत नाही, तोपर्यंत आमची लढाई अशीच चालू राहणार असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. ते मणदूर (ता. शिराळा) येथील हुतात्मा स्मारक येथे सुरू असणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. याबरोबरच स्थानिक व बाहेरील पाण्याचा एकत्रित वापर करून जलयुक्त शिवारातील खड्डे भरता आले. पाण्याचा सुयोग्य वापर झाला, तर कोट्यवधी रुपयांचा दुष्काळावर होणारा खर्च वाचणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या नोटाबंदीमध्ये दहा टक्केसुध्दा काळा पैसा बाहेर आला नाही. शासनाने शेतकऱ्यांची कर्जे रद्द करावीत, विठ्ठलाची पूजा समतावादी पध्दतीनेच व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. अन्यथा ९ आॅगस्ट क्रांतिदिनी वारकरी संप्रदायासमवेत याच्याविरोधात लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी गेल आॅम्वेट, संपत देसाई, प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, दिलीप पाटील, मालोजी पाटणकर, मारुती पाटील, मेजर सुभेदार बन, वसंत पाटील, अंकुश शेडगे, दिलीप गायकवाड, शरद जांबळे यांचासह तिनशेहून अधिक श्रमिकचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
‘महात्मा फुले व्हिजन’साठी लढाई
By admin | Published: January 09, 2017 11:00 PM