सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे. ‘नाम’ला कोणतेही श्रेय नको असून, आजवर झालेल्या कामाचे तमाम जनतेला श्रेय दिले पाहिजे. यापुढेही दुष्काळ मुक्तीसाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नाम फौंडेशनचे संस्थापक, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सोमवारी येथे केले.
जलसंधारणातील कामातील नाम फौंडेशनच्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अनासपुरे पुढे म्हणाले की, जत, माण, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी जे काम झाले आहे, त्यात तेथील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यात ‘नाम’ची भूमिका निमित्तमात्र आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचीच ही पोहोचपावती आहे. समाजात या ना त्या कारणाने कडवटपणा वाढत चालला असताना, गेल्या अडीच वर्षात ‘नाम’ने प्रभावी केले काम केले आहे.
शिवारे जलयुक्त करणे हेच एकमेव उद्दिष्ट असून कोणतेही राजकारण केले जाणार नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात २० गावात कामाचे उद्दिष्ट होते. यंदा ५० गावात कामाचे नियोजन असून १३ कामे सुरू झाली आहेत.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी याच दिवसात जिल्ह्यात १५१ टॅँकर सुरू होते. आता एकही टॅँकर नाही. यावरून वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या कामाची प्रचिती येते. आठवड्यातील दोन दिवस अधिकारी व कर्मचारी स्वत: काम करणार आहेत.यावेळी नाम फौंडेशनचे गणेश थोरात, अविनाश सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी, किरण कुलकर्णी, अश्विनी जिरंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.‘आभाळमाया’तर्फे निधीचा धनादेशजलयुक्तच्या कामासाठी येथील आभाळमाया फौंडेशनच्यावतीने जिल्हा प्रशासनास ८ लाख ८८ हजार ८८८ रूपयांच्या निधीचा धनादेश मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणजे तोफखानामकरंद अनासपुरे म्हणाले की, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. ते म्हणजे तोफखाना असून त्यांचा कामाचा धडाका यापूर्वीही अनुभवला आहे. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत असल्याचा माझा अनुभव आहे.