दत्ता पाटील तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत संशयकल्लोळाच्या बोहल्यावरच रणांगण रंगणार असल्याचे चित्र आहे.गतवेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील विरुध्द भाजपचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात सामना रंगला होता. पाटील यांनी बाजी मारली होती. त्यानंतर काही महिन्यांतच पाटील यांचे निधन झाले. घोरपडेंना रसद पुरविणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ती पोटनिवडणूक एकतर्फीच झाली.आताची निवडणूक मतदारसंघाला कलाटणी देणारी ठरणार आहे. येथे वर्षानुवर्षे आर. आर. पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र त्यांच्या पश्चातील नेतृत्वाची पोकळी, भाजपची सत्ता आणि खासदार पाटील यांचा जनसंपर्क यामुळे भाजपचे वर्चस्व वाढले आहे.ही निवडणूक सुमनतार्इंचा कस पाहणारी, त्याहीपेक्षा पुढील निवडणुकीचे उमेदवार आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा प्लॅटफॉर्म निश्चित करणारी आहे.
राजकीय अपरिहार्यता म्हणूनच यावेळी राष्ट्रवादीकडून सुमनताई उमेदवार असतील. पुढील निवडणुकीत रोहित पाटील हेच उमेदवार असतील. तशी घोषण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच केली आहे.तासगाव तालुक्याचा आमदार असावा, या मानसिकतेतून तालुक्यातून उच्चांकी मताधिक्य मिळेल, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. एका गटाला खासदार गटाकडून रसद मिळेल अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मदत केल्यामुळे वंचित फॅक्टर पथ्यावर पडेल, अशीही अपेक्षा आहे, तर राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेले आर. आर.प्रेमीही मदत करतील, अशीही अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. या अपेक्षा पूर्ण होतील की नाही, याच संशयकल्लोळाच्या बोहल्यावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली जाणार आहे.भाजपकडून अजितराव घोरपडे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार, येथून संशयकल्लोळ सुरु आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. जागा वाटपात ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यताही कमी आहे. मागील निवडणुकीपासून यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत घोरपडे आणि खासदार पाटील यांच्यात संघर्ष सुरु होता. अगदी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घोरपडे आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत लढवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत घोरपडेंनी खासदारांशी जुळवून घेतले.कवठेमहांकाळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार-घोरपडेंची हातमिळवणी, लोकसभा निवडणुकीत घोरपडे-खासदारांची हातमिळवणी, आमदारांच्या काही कार्यकर्त्यांची विशाल पाटलांशी, तर काहींची पडळकरांशी हातमिळवणी, असे अनेक रंग मतदारसंघाने अनुभवले आहेत.