आटपाडी : आधी एक-दोन दिवस संपर्क साधून नंतर हनी ट्रॅपमध्ये सावज अडकल्यानंतर ब्लॅकमेलिंगचा प्रकार आता मागे पडत आहे. आता थेट व्हिडिओ कॉल करून अवघ्या दोन-तीन सेकंदांचे फक्त चेहऱ्याचे चित्रण झाल्यावर तुम्ही कॉल बंद केला तरी लगेच तुमचा चेहरा आणि खाली नग्न शरीराचा भाग हुबेहूब चिटकविण्याची तांत्रिक करामत करून ब्लॅकमेल केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे.
स्थळ- आटपाडी पोलीस ठाणे. वेळ- मंगळवारी रात्री १० ची. एका संगणकशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेला तरुण मित्रासोबत घाबरगुंडी उडालेल्या अवस्थेत तिथे आला. विशेष म्हणजे त्याचा उद्या वाढदिवस आहे. तिथे उपस्थित असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी प्रथम त्याला पूर्ण धीर दिला. सगळी हकिकत विचारली.
तरुण घाबरत म्हणाला, घरी होतो व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. तो उचलला. समोर मुलगी ! लगेच लक्षात आलं हा धोका आहे. काॅल बंद केला; पण थोड्याच वेळात मला व्हॉटसॲपवर एक व्हिडिओ आला. तो पाहून मी पुरता घाबरून गेलो. मी तसे काही केले नव्हते. काय करावे हे सुचेना, तेवढ्यात पाच हजार ऑनलाइन पाठव, नाहीतर हा व्हिडिओ त्याच्या सर्व फेसबुकवरील मित्रांना पाठविण्याची धमकी आली. मी म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत, मग एक हजार पाठवले पुन्हा लगेच पाच हजार मागितले. नाही दिले तर माझ्या फेसबुक मित्रांची नावे त्याने पाठवून हा व्हिडिओ त्यांना पाठवण्याची धमकी देण्यात आली. सतत धमकीचे संदेश पाठवून हैराण केले.
चौकट
यातून वाचण्यासाठी एवढे करा !
कोणत्याही अनोळखी मुलीचा, महिलेच्या मैत्रीच्या फंदात पडू नका. त्यांच्या व्हिडिओ कॉलला अजिबात प्रतिसाद देऊ नका. मागील आठवड्यात तब्बल ६० हजार रुपयांची टोपी बसल्यानंतर एकजण पोलिसांना भेटला. या तरुणालाही जेव्हा संशयितांनी पैसे पाठव नाही तर तुझा मोबाइल नंबर आणि तो व्हिडिओ सायबर पोलिसांना देण्याची धमकी दिली. तेव्हा त्याने मीच सध्या पोलीस ठाण्यात आलो आहे, असा संदेश पाठवताच धमकीचे संदेश येणे लगेच बंद झाले.
कोट
व्हिडिओ व्हायरल केले, तर त्याचा वेगळा गुन्हा त्यांच्यावर दाखल होतो. घाबरून जाऊ नये. पोलिसांशी संपर्क साधावा.- सुधीर पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक, आटपाडी