संख : अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष, ग्राहकांचे अज्ञान यामुळे जत शहरात, ग्रामीण भागात फिरुन घातक रसायने वापरून पिकविलेल्या आंबा, केळी, चिकू या फळांची विक्री सुरू आहे. पैसे देऊन विकतचे दुखणे घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे.
कोरोनाच्या संकटात व 'फिट अँड फाईन' राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळे फायदेशीर आहेत. फळांना सध्या मोठी मागणी आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कच्ची केळी, आंबा, चिकू खरेदी करतात.
झाडावरून तोडलेले फळ नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी १२ ते १५ दिवस लागतात. मात्र व्यापारी त्वरित नफा कमविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड, इथरेस, इक्रॉन यासारख्या घातक रसायनांचा वापर करून फळे पिकवितात. फळांच्या पेटीत, करंडीत, ट्रेमध्ये कॅल्शिअम कार्बाईडच्या पुड्या ठेवतात. इथरेस, इक्रॉनचे गुलाबी, पांढरे, रंगहीन द्रावण करून फळांना बारीक ठिपके लावले जातात.
कार्बाईडचा वापर वेल्डिंग कामासाठी केला जातो. त्याच्या वापरामुळे फळांच्या पेटीची उष्णता वाढून फळे वेळेच्या आधीच पिकतात. फळाला पिवळा रंग येतो. चकाकी येते. ग्राहक जादा पैसे देऊन ती खरेदी करतात.
विक्रेता ग्राहकाला नमुना म्हणून नैसर्गिकरित्या पिकविलेल्या फळाची फोड कापून खायला देतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास पटतो.
वास्तविक या रसायनांमुळे फळांमधले नैसर्गिक सत्व कमी होते व ते फळ विषारी बनते.
आंबे पाडाला आल्यानंतर तोडून गव्हाचे काड, चगाळा, पाला-पाचोळा यांच्यात झाकून ठेवतात. केळीचा घड परिपक्व झाल्यावर काढला जातो. फण्या वेगळ्या करून करंडीत ठेवल्या जातात. तसेच चिकूही परिपक्व झाल्यावर झाडावरून तोडून पोत्यावर, पाटीत ठेवून नैसर्गिकरित्या पिकविले जातात. व्यापारी नफेखोरीचा विचार करून फळे नैसर्गिकरित्या पिकवित नाहीत.
चौकट
ग्राहक हो, काळजी घ्या
फळांमधील कार्बाईडच्या अंशामुळे शरीरात इथिलीन नावाचा गॅस तयार होतो. त्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग, डोकेदुखी, अपचन, पोटाची जळजळ, जुलाब, उलट्या यासारख्या तक्रारी वाढतात. तसेच शरीरात इथिलीन गॅसमुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे.
ओळखण्याचे साधनच नाही
बाजारातून विकत घेतलेले फळ नैसर्गिकरित्या पिकलेले आहे की कृत्रिमरित्या पिकविलेले आहे, हे शोधण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. प्रयोगशाळेत त्याचे परीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे मुजोर झालेले फळविक्रेते ग्राहकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.
याकडे अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.