सांगली : जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त असतानाही अनेक तरुण बंदोबस्तालाही चकवा देऊन पसार होत आहेत. रविवारी दुपारी कर्मवीर चौकात एका दुचाकीवरून तिघे तरुण चालले होते. त्यांना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, ते वेगाने निघून गेले. पोलिसांनी वाहन क्रमांक नोंद करून घेतला असला तरी जीव धोक्यात घालून तरुणांनी वेगात पलायन केल्याने पोलीसही चक्रावले होते.
----
भंगार निघून गेल्याने पोलीस ठाणी चकाचक
सांगली : शहरातील पोलीस ठाण्यांच्या आवारातील अनेक वर्षे पडून असलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे. लिलाव घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने वाहने नेली जात आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात असलेला जुन्या वाहनांचा कचरा आता कमी होण्यास मदत होणार आहे.
----
मिरज-माधवनगर रोडवरील गतिरोधक धोकादायक
सांगली : मिरज-माधवनगर रोडवर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे भारत सूतगिरणी चौकासह प्रमुख ठिकाणी केलेले गतिरोधक जादा असल्याने पुन्हा अपघातांना निमंत्रण मिळत आहे. बांधकाम विभागाने या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून घेतल्याने वाहनधारकांना वेग नियंत्रण करण्यात मदत होत असली, तरी जादा उंचीमुळे वाहनाचा तोल सांभाळणे जिकिरीचे बनत आहे.