निवास पवार -- शिरटे--क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याच्या नयनमनोहारी सुशोभिकरणाचे उद्घाटन गुरुवारी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्याहस्ते करण्यात येत आहे. स्वातंत्र्य चळवळीनंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्या शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला, त्याच पक्षात अखेरपर्यंत राहणारे आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते हा कार्यक्रम होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव यादव यांनी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसरात सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. ते नुकतेच पूर्ण झाले आहे. क्रांतिसिंहांचा आदर्श लहान, थोरांच्या डोळ्यासमोर राहावा, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सुशोभिकरणाचे काम यादव यांनी पूर्ण केले. गुरुवार, दि. ३ रोजी शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांच्याहस्ते सायंकाळी ४.३० वाजता याचे उद्घाटन होत आहे. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत. येडेमच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावात त्यांच्याच गावात असलेल्या त्यांच्या पुतळा परिसराची दुरवस्था झाली होती. पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस धबधबा, बगीचा, फुलझाडे, आकर्षक विद्युत रोषणाई, पुतळ्यासाठी संरक्षक कठडा व छत आदी कामे अत्यंत चांगल्या पध्दतीने करुन घेतली आहेत. या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणामुळे चौकाची शोभा आता वाढणार आहे. सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार कार्यक्रमास माजी खासदार विश्वासराव पाटील, सोनहिरा सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, नानासाहेब महाडिक, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, क्रांतिसिंहांचे नातू अॅड. सुभाष पाटील हे सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात सर्जेराव यादव यांचा सत्कारही होणार आहे.सर्वपक्षीय मान्यवरांच्याहस्ते क्रांतिसिंहांच्या पुतळा सुशोभिकरणाच्या उद्घाटनामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. उद्योजक सर्जेराव यादव यांनी पुतळा सुशोभिकरणाचे काम उत्कृष्ट केले आहे. यामुळे चौकाची शोभा वाढली आहे. यापुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुतळा व परिसराच्या देखभालीचे काम करू.- संजय पाटील, सरपंच, येडेमच्छिंद्र.
क्रांतिसिंहांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण
By admin | Published: December 02, 2015 12:08 AM