कोल्हापूर : वीटभट्टीवर काम करणाºया कुटुंबातील, कुणी कचरावेचक, काहीजण बालमजुरीतून मुक्त होऊन शिक्षणाच्या प्रवाहात आलेली पण वास्तवाचे चटके सोसलेली; अशा लहानग्यांनी आपल्या अनुभवातून आणि भावविश्वातून साकारलेल्या ‘थेंबे थेंबे तळे साचे’ आणि ‘सरळ रेष’ या लघुपटांनी उपस्थितांना अंतर्मुख बनविले.
बालअधिकार दिनाचे औचित्य साधून वंचित घटकांतील मुलांसाठी काम करणाºया अवनि संस्थेच्यावतीने शाहू स्मारक भवनात सोमवारी या लघुपटांच्या प्रीमिअर शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, राज्याचे माजी सचिव प्रेमकुमार, ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडिया, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, अभिनेते पुष्पराज चिरपुटकर, पारस ओसवाल उपस्थित होते. यावेळी पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांनी बहारदार गाणीसादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
फिल्म बग्ज या मुलांसाठी व मुलांबरोबर चित्रपट निर्मिती करणाºया संस्थेच्या प्रमुख नमिता प्रेमकुमार यांनी मार्च महिन्यात ‘अवनि’तील मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यातील अवनि बालगृहातील ४० कचरा वेचक वस्तीतील मुलांनी एकत्र येऊन लघुपटाची निर्मिती केली. त्यातील ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हा लघुपट स्थलांतरित कुटुंबातील वीटभट्टीवर काम करणाºया शोषित आईच्या मुलभूत प्रश्नांवर मुलाने शोधलेल्या सकारात्मक कृतीवर भाष्य करतो. हा लघुपट मुलांनी अनुभवलेल्या दु:खातून आकाराला आला आहे, तर सरळ रेष हा चित्रपट मुलांच्या कल्पनाशक्तीतून भावविश्वातून निर्माण झाला आहे.
या लघुपटांचे सादरीकरण मे महिन्यात ‘इंडिया अलाईव्ह’ या चित्रपट महोत्सवात झाले. त्यात ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या लघुपटाला बेस्ट स्टोरी व उत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला तसेच नऊ नामांकने मिळाली, तर ‘सरळ रेष’ या लघुपटातील अमृता ढोकणे या विद्यार्थिनीला अभिनयाचा पुरस्कार मिळाला.या दोन्ही लघुपटांच्या प्रीमिअर शोसाठी आलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच वीटभट्टी व कचरा वेचक महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने झाली. संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविक केले.