सांगली : बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनने शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठीची मुदत दि. १२ नोव्हेंबरपर्यंत आहे. तरीही शंभर टक्के शून्य पेमेंट न झाल्यामुळे शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरपर्यंत सांगलीचे बेदाणा सौदे बंद ठेवण्याचा निर्णय अडत संघटनेने घेतला आहे.सांगली, तासगाव आणि पंढरपूर येथील बेदाणा सौद्यामध्ये हजारो कोटींची उलाढाल होत आहे. या ठिकाणी होणाऱ्या सौद्यात देशभरातील व्यापारी सहभागी होत आहेत. यामुळे या व्यापाऱ्यांकडील अडते, शेतकऱ्यांचे सर्व पैसे येण्यासाठी दि. १३ ऑक्टोबर ते दि. ११ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे बंद ठेवले होते. शुक्रवारी महिना संपत असतानाही अजून शंभर टक्के शून्य पेमेंट झाले नसल्यामुळे सांगली बेदाणा सौदे दि. १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.सांगली अडत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये शून्य पेमेंट सप्टेंबर २०२२ या महिन्यापर्यंत झाले आहे. उर्वरित ऑक्टोबर महिन्याचे पैसे देण्यासाठी गुरुवार, दि. १७ ऑक्टोबरपर्यंत व्यापाऱ्यांना मुदत देणार आहे. बेदाणा सौद्यातील सर्व हिशेब घेतल्यानंतर शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरपासून सांगलीतील बेदाणा सौदे सुरू होणार आहे.तासगाव आणि पंढरपूर येथील बेदाणा सौद्यांचा हिशेब पूर्ण होत आला आहे. यामुळे येथील बेदाणा सौदे सुरू करण्याबाबत तेथील व्यापारी आणि अडते निर्णय घेणार आहेत.
सांगलीचे बेदाणा सौदे १८ नोव्हेंबरपासून होणार, शून्य पेमेंट न झाल्याने अडत्यांनी बंद ठेवले होते सौदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 2:08 PM