टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या लाॅकडाऊनला ग्रामस्थांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. मरगाई देवीची यात्रा रद्द झाल्याने केवळ पुजाऱ्यांकडून विधिवत पूजा करण्यात आली. ग्रामस्थांनी मंदिरात गर्दी करू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी ग्रामस्थांसह बेडग येथील ग्रामपंचायत सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. तहसीलदार कुंभार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी सर्व दुकाने बंद ठेवून व गर्दी टाळत बेडग बंदला चांगला प्रतिसाद दिला. मरगाई देवीची यात्राही रद्द झाल्याने केवळ पुजाऱ्यांकडून मरगाई देवीची विधिवत पूजा करून मंदिर बंद करण्यात आले. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बेडग येथील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.