लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या नव्या रुग्णांची दररोजची संख्या हजारापर्यंत झेपावू लागताच कोविड रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील बेडदेखील फुल्ल होऊ लागले आहेत. गुरुवारअखेर जिल्हाभरात २६७ बेड शिल्लक होते. व्हेंटीलेटरची उपलब्धताही पुरेशा संख्येने नसल्याने कोरोनाबाधितांचे प्राण कंठाशी येऊ लागले आहेत.
शासकीय, खासगी व महापालिकेच्या ५० रुग्णालयांत एकूण २,५८२ बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हेंटीलेटरचे बेड फक्त ३२२ आहेत. अतिदक्षता विभागात ६६६ तर जनरल वॉर्डमध्ये १९१६ बेड आहेत. अतिदक्षता विभागातील ६६६ पैकी २६७ बेड गुरुवारी संध्याकाळपर्यंत उपलब्ध होते. जनरल वॉर्डमध्ये १,१५२ बेड रिकामे आहेत.
मिरज कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात ९८ पैकी फक्त १५ बेड रिकामे आहेत. तेथील ७५ व्हेंटीलेटरही रुग्णांच्या वापरात आहेत. जनरल वॉर्डमध्ये ६४ बेड शिल्लक आहेत. भारती रुग्णालयाच्या अतिदक्षतामध्ये फक्त दोन तर जनरल वॉर्डमध्ये फक्त १७ बेड उपलब्ध आहेत. अन्य सर्व खासगी रुग्णालयांतही मोजकेच अतिदक्षता बेड शिल्लक आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांची सर्वाधिक मागणी व्हेंटीलेटरसाठी आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण येत आहे. मिरज कोविड रुग्णालयात ७५ व्हेंटीलेटर बेड आहेत, उर्वरित खासगी रुग्णालयांत २४७ आहेत. मिरज रुग्णालयात व्हेंटीलेटर रिकामे नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात न्यावे लागत आहे. प्राण कंठाशी आलेल्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेईपर्यंत नातेवाईकांचाही श्वास कोंडू लागला आहे. या पळापळीत अनेकदा रुग्णांना प्राणही गमवावे लागत आहेत.
चौकट
ऑक्सिजनचा निर्णय डॉक्टरांवर सोपवा
ग्रामीण आणि शहरी भागातूनही रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यासाठी नातेवाईक आक्रमक होत असल्याचे अनुभव आहेत. पण व्हेंटीलेटरचा निर्णय नातेवाईकांनी स्वत: न घेता डाॅक्टरांना घेऊ द्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ग्रामीण भागात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था जिल्हा परिषदेने केली आहे. रुग्णाला व्हेंटीलेटर लावण्याची वेळ येण्यापूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्रात न्या, तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होते, असा डॉक्टरांचा अनुभव आहे.