सांगली : महापालिकेत अनेक प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना शववाहिकेच्या दुरुस्तीसाठी पैसे आहेत, पण निधी नाही, वारंवार शववाहिका खराब होत असून नागरिकांना ढकलून सुरू करावी लागत आहे. याच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचने शहरात भीक मांगो आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
लेंगरे म्हणाले की, महापालिकेची शववाहिका वारंवार वंद पडत असून जनतेच्या भावनेशी खेळ सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांना शववाहिकेला धक्का मारण्याची वेळ आली आहे. तसेच मृतदेह खाजगी वाहनातून घेवून जावे लागत आहे . ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. प्रशासन कोटयावधी रूपयाचे घनकचरा, नालास्वच्छता या सारख्या प्रकल्पात नियम व अटी धाब्यावर बसवून प्रकल्प पूर्ण करत आहेत.
जनतेच्या मनात या प्रकल्पावददल भ्रष्टाचाराचा वास येत असून कोटयावधी रूपयाची उधळपट्टी केली जात आहे. पण अंतयात्रेसाठी शव वाहिका दुरुस्त करणे अथवा किंवा नवीन खरेदी करण्यात हाताला लकवा मारतो. जनतेच्या भावनेशी खेळण्याचे काम बंद झाले पाहिजे.महापालिकेला शव वाहिका दुरूस्तीसाठी मदनभाऊ युवा मंच जनतेकडून भिक मागून पैसे गोळा करीत आहे. जमा झालेले सर्व रक्कम युवा मंच मनपा प्रशासनास देणार आहे. प्रशासनाने तातडीने शववाहिका सुस्थितीत करावी अथवा नवीन घ्यावी, अन्यथा गदनभाऊ युवा मंचतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी संजय ऊर्फ चिंटू पवार, संजय कांबळे, युवराज इंगळे, आप्पा आठवले, किरण यादव, सुनील कांबळे, राकेश साणकर, रोहित जावळे, सचिन कांबळे, आकाश चलवादे, सचिन ठोकळे, नितीन कांबळे, अविनाश जाधव, महेश पाटील, शानूर शेख, मयूर बांगर आदी उपस्थित होते.
निवेदन घेतले पैसे नाही
युवा मंचाने बाजारपेठत फिरुन प्रत्येकी दहा रुपये जमा केले ही रक्कम सहाय्यक आयुक्तांना देण्यासाठी पदाधिकारी गेले. पण त्यांनी जमा झालेली रक्कम स्वीकारली नाही. युवा मंचाचे निवेदन मात्र त्यांनी घेतले.