तांदूळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) परिसरातील कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी उसाच्या आडसाली लागणींना सुरुवात केली आहे.
शेती वारणा नदी व विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. ऊसपीक आडसाली स्वरुपात घेतले जाते. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात लागण केली जाते. त्यामुळे येथील शेतकरी एप्रिलपासून शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी धावपळीत दिसत असतात. मे महिन्यात वळीव पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने शेतकरी उसाच्या आडसाली लागणींना गतीने सुरुवात केली आहे. दुय्यम पीक म्हणून सोयाबीन, भूईमूग, भात ही पिके शेतकरी घेत असतो; पण या पिकांची टोकण व पेरणीचा हंगाम पंधरा दिवसांनी लांब असल्याने आडसाली उसाच्या लागणी करण्यामध्ये शेतकरी व्यस्त आहे.