लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्यावतीने शहरातील विविध चौकासह काळी खण सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्व कामांच्या तांत्रिक सर्व्हेला सोमवारी सुरुवात झाली. चौकातील जमिनीची समतलता, काळ्या खणीतील पाण्याची खोली याचा सर्व्हे केला जाणार आहे.
महापालिकेच्यावतीने स्टेशन चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, मिरजेतील गांधी चौकांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याशिवाय सांगलीतील काळी खणीच्या सुशोभीकरणासाठी सव्वा कोटीची निविदाही मंजूर करण्यात आली आहे. लवकरच या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी चौकातील जमिनीची समतलता, इमारती, जमिनीखालील जलवाहिनी, ड्रेनेज वाहिनी, केबल याचा ड्रोनच्या साहाय्याने तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच काळ्या खणीची खोली, त्याखालील जमिनीचा स्तर, आदी बाबींची माहिती काम सुरू करण्यापूर्वी गरजेचे होते. सोनार साऊंडिंगच्या साहाय्याने काळी खणीचा सर्व्हे हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने खासगी कंपनी नियुक्त केली आहे.
या सर्व्हेतून चौक व काळ्या खणीचा ॲटो कॅड डाटा तयार होणार आहे. त्यामुळे या चौकात अथवा काळी खणीचे सुशोभीकरणाच्या कामात हा डाटा उपयोगी पडणार आहे.
सोमवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, शहर अभियंता संजय देसाई, नगरअभियंता पी. एम. हलकुडे, शाखा अभियंता वैभव वाघमारे, महेश मदने, डाॅ. सतीश कमाने यांच्या उपस्थितीत या सर्वेच्या कामाला सुरुवात करण्यात आली.