सांगली : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह परस्पर जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे हे सरकार अमानवी असल्याचे दिसत आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी ट्विटरद्वारे केली.त्यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.
त्यांनी म्हटले आहे की, कुटुंबियांच्या गैरहजेरीत भारताच्या मुलीवर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारचे हे वागणे अमानवी व दुदैवी आहे. मुलींना जीवंतपणी येथे ना सन्मान मिळतो, ना मेल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वारंवार घेतात. केवळ नाव घेण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा त्यांनी घ्यावी.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जर न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य निर्माण करता येत नसेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. योगी आदित्यनाथ यांना त्यांनी टॅग करीत टीका केली आहे. जयंत पाटील यांनी या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारवर आगपाखड केली असून महाराष्ट्रातील राजकारणीही भाजप सरकारवर टीका करू लागले आहेत.