लोकमत न्यूज नेटवर्कमिरज (जि. सांगली) : मिरज दंगलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपाचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांच्यासह ५१ जणांविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला शासनाने मागे घेतला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गृह विभागाचे खटला मागे घेण्यात आल्याचे पत्र मिरज न्यायालयात सादर करून, या निर्णयाबद्दल पेढे वाटून आनंद व्यक्त केला.मिरजेत २००९मध्ये गणेशोत्सवात पोस्टरच्या वादातून झालेल्या दोन गटांतील दंगलीप्रसंगी जमावाने ब्राह्मणपुरीतील गजानन मंगल कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला होता. पोलिसांनी श्रीकांत चौकात जमावाला रोखल्यानंतर, जमावाने पोलिसांवर दगडफेक करून रस्त्यावर टायर पेटविले होते. पोलीस वाहनासह हॉटेल्स व दुकानांवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, हणमंत पवार, ओम्कार शुक्ल, पांडुरंग कोरे, अरविंद लोहार, तानाजी घारगे, गणेश पलसे, अभय सहस्रबुद्धे, अरविंद देशपांडे, महेश सहस्रबुद्धे, सौ. प्राची पाठक, दिलीप पाटील, संगीता पाटील, कुसूम पवार यांच्यासह सुमारे ५१ भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांवर दोषारोपपत्र दाखल केले होते. एकच खटला मागे मिरज दंगलप्रकरणी पोलिसांनी ३७ गुन्हे दाखल करून दोन्ही गटांच्या सुमारे ६०० जणांना अटक केली होती. दंगलीत निरपराध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी आमदार सुरेश खाडे यांनी शासनाकडे केली होती. मात्र, आ. खाडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे संशयित असलेला दंगलीचा एकच खटला शासनाने मागे घेतला आहे.
पाटील, खाडे यांच्यावरील खटला मागे
By admin | Published: July 05, 2017 3:53 AM