मिरज : दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक पी. राजालिंगम बासू यांनी बेळगाव-पुणे इंटरसिटी, व्हाया बेळगाव, मिरज, पंढरपूरमार्गे, हुबळी-नांदेड एक्स्प्रेस व मिरज, पंढरपूर, सोलापूरमार्गे बेळगाव-कलबुर्गी एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन दिले. मध्य रेल्वेचे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी व किशोर भोरावत यांनी हुबळी येथे पी. राजालिंगम बासू यांची भेट घेऊन नवीन रेल्वेगाड्यांसह कोरोनाकाळात बंद केलेल्या गाड्या सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी दक्षिण-मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट असलेला व आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागात समाविष्ट केलेला भाग दक्षिण पश्चिम रेल्वेत समाविष्ट करून मिरज स्वतंत्र विभाग करावा. गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसचा नवी दिल्लीपर्यंत विस्तार करावा. या गाडीस एलएचबी बोगी जोडाव्यात. या गाडीस लिंक असलेली हुबळी कोच सुरू करावी.
सातारा, कराड येथील प्रवाशांसाठी लोंढा येथे या गाडीस वास्को-यशवंतपूर एक्स्प्रेसला लिंक द्यावी. यशवंतपूर-निजामुद्दीन कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाडीचा डेहराडूनपर्यंत विस्तार करावा. कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांना मध्य रेल्वेच्या पुणे विभागात कराड व सातारा या स्थानकात थांबा द्यावा.