मिरज : बंगळुरू ते हुबळी धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत केल्यानंतर आता बेळगावी पुणे इंटरसिटी एक्स्प्रेससाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू झाल्यास मिरज, सांगलीतून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध होणार आहे.
बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बेळगाव-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येने नोकरी व कामधंद्यासाठी पुण्याला नेहमी ये-जा करतात. या सर्वांसाठी इंटरसिटी रेल्वे सोयीची असल्याने बेळगाव-पुणे दरम्यान दररोज इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे. बेळगावीचे दिवंगत खासदार व रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगावी पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस मंजूर केली होती. मात्र, पुणे स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याच्या कारणावरून मध्य रेल्वेने इंटरसिटी एक्स्प्रेस थांबविली होती. अंगडी यांच्या निधनानंतर बेळगावातून महाराष्ट्रात नवीन रेल्वेगाड्या सुरू झाल्या नाहीत. आता बेळगाव-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी बेळगावातील लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्री व रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षाकडे पाठपुरावा सुरू केल्याने लवकरच ही इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
या इंटरसिटी रेल्वेसाठी नैऋत्य रेल्वे व मध्य रेल्वेची परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वेगवान इंटरसिटी एक्स्प्रेसचा सांगली, मिरजेतील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. कोल्हापूर-पुणे वंदेभारत एक्स्प्रेसची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. ही एक्स्प्रेस आता पुणे-मिरज दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.