सांगली : कोरोनाची दुसरी लाट अद्यापही जिल्ह्यात कायम असताना, शासनस्तरावरुन तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने प्रशासनाने दुसरी लाट नियंत्रणात आणण्यास प्राधान्य देतानाच तिसऱ्या लाटेविषयी सज्जता ठेवली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.
राज्यात दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे ओसरतानाही वेळ लागेल, अशीच स्थिती आहे. मात्र, त्याचवेळी तिसऱ्या लाटेची शक्यताही असल्याने दुसरी लाट थोपविण्याबरोबरच संभाव्य वाढता संसर्ग रोखण्यासाठीही प्रशासनाची कसरत सुरु आहे.
दुसरी लाट सुरु झाल्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजन प्लांटही उभारले होते. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने खास पीडियाट्रीक टास्क फोर्सची स्थापना केली आहे. तसेच लहान मुलांवरील उपचारासाठी आवश्यक औषधे, उपकरणांसह बेडच्या नियोजनाचेही निर्देश देण्यात आले आहेत.
चौकट
ऑक्सिजन बेड वाढणार
आरोग्य यंत्रणेने शहरातील ऑक्सिजन बेड वाढविण्याबरोबरच तालुका पातळीवरही सेवा देण्यासाठी नियोजन केले आहे. अगदी मोठ्या गावात सक्षम वैद्यकीय सेवा देणाऱ्या केंद्रासाठीही परवानगी देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडच्या संख्येत वाढ होणार आहे.
कोट
लहान मुलांसाठी केअर सेंटर
तिसरी लाट येईलच, या शक्यतेने प्रशासनाने लहान मुलांच्या उपचाराला विशेष प्राधान्य दिले आहे. लहान मुलांना संसर्ग झाल्यास त्यांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी कोविड सेंटरसह इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
चौकट
तालुका पातळीवरही ऑक्सिजन प्लांट
* कोरोना काळात ऑक्सिजनची असलेली गरज ओळखून आता तालुका पातळीवर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन सुरु आहे. यातील काही प्रकल्पांचे काम सुरु झाले आहे तर काही ठिकाणी ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यात येत आहे.
* जिल्हा नियाेजन समितीसह इतर निधीतून व्हेंटिलेटरची उपलब्धता केली आहे. तालुका पातळीवरही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
* सांगली, मिरजेसह इस्लामपूर, विटा, तासगाव आणि जत येथील रुग्णालयांत ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे.
कोट
जिल्ह्यात अद्यापही दुसऱ्या लाटेचा संसर्ग कायम आहे. या लाटेतील संसर्ग कमी करण्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या लाटेचेही नियोजन करण्यात येत आहे. बेडची संख्या वाढविण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी.