सांगली : राज्य शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी सुरू केली. महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर दोन दिवसांत सांगली विभागातील दहा एसटी आगारांमधून एक लाख २० हजार महिला प्रवाशांनी ‘सन्मान’चा ५० टक्के सवलतीत प्रवास केला आहे. ५० टक्के सवलतीच्या दराने मिळालेल्या तिकिटांमुळे प्रवासी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एसटीच्या उत्पन्नातही ६० लाख ५८ हजार २४० रुपयांची भर पडली आहे.राज्य शासनाने अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी आठवडाभरातच सुरू केली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या साधी, मिनी, निमआराम, विनावातानुकूलित स्लिपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व प्रकारच्या एसटी बस प्रवासात ही सवलत लागू झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांची एसटीकडे गर्दी वाढली आहे. शनिवारी एका दिवसात ६२ हजार ५८१ महिलांनी प्रवास केला असून, त्यापासून ५० टक्के तिकीट दरानुसार १४ लाख ७५ हजार ८७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शासनाकडून उर्वरित ५० टक्के रक्कम एसटीला मिळणार आहे. रविवारी पुन्हा ५६ हजार ९८७ महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला असून, १५ लाख ५३ हजार २४३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तेवढीच रक्कम शासनाकडून मिळणार आहे. दोन दिवसांत एसटीला शासनाकडून मिळणाऱ्या रकमेसह ६० लाख ५८ हजार २४० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, असे एसटी महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. याचा परिणाम लगेच प्रवासी संख्येच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
खासगी बसेसकडून पुन्हा एसटीकडेराज्यभरात ही सवलत लागू असल्याने पुणे, कोल्हापूर, सातारा या मार्गावरील प्रवासी महिलांचा ओढा एसटीकडे वाढला. आरामदायी बसेसच्या तुलनेत हा खर्च निम्म्यावर आल्याने या महिलांनी खासगी बसेसपेक्षा एसटीला पसंती दिली. तसेच वातानुकूलित, स्लिपर वाहनांनाही सवलत असल्याने एसटी प्रवासाकडे आपोआप ओढा वाढत आहे.आगारनिहाय महिला प्रवासी संख्याआगार - प्रवासी - उत्पन्नसांगली - १२,४८२ - ४,९४,७६२मिरज - १०,५१९ - ३,८५,४८६इस्लामपूर - १७,४१७ - ३,३२,१३३तासगाव - १४,०९२ - ३,०५,५३९विटा - १४,८८१ - २,७१,३२७जत - ९,०२१ - ३,२६,४३७आटपाडी - ९,०१४ - २,३७,३५१कवठेमहांकाळ - ९,०८७ - २,५३,५५६शिराळा - १३,६६८ - २,५२,०६२पलूस - ८,३८७ - १,६७,४३७एकूण - १,१९,५६८ - ३०,२९,१२०