सांगली : राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.प्रज्ज्वला योजनेंतर्गत महिला बचत गटांचे प्रशिक्षण विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या सुविद्य पत्नी मंजली गाडगीळ, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, महानगरपालिका महिला व बाल कल्याण सभापती मोहना ठाणेदार, महिला कायदे सल्लागार ॲड. जयश्री पेंडसे, प्रज्ज्वला समितीच्या शालाखा साळवी आदि मान्यवर उपस्थित होते.श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिला आयोगाकडून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. प्रज्ज्वला योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात 'एक जिल्हा एक वस्तु' असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत.तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी 'बचत गट बाजार' जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. महिलांना न्याय व सन्मान मिळण्यासाठी महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजना, त्यांचे अधिकार व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगून श्रीमती रहाटकर म्हणाल्या, सर्वसामान्य महिला एकमेकीचा हात धरून पुढे जाऊ शकतात. यासाठी बचत गटांची स्थापना करून विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावेत व आर्थिक सक्षमीकरण करावे.उद्योगासाठी बँकेमार्फत मुद्रा योजनेतून एक लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात येणार आहे याचा बचत गटांनी लाभ घ्यावा. काही अडीअडचणी आल्यास लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडीअडचणी सोडवाव्यात. प्रज्ज्वला योजनेमुळे राज्यातील बचत गट आणखी प्रज्वलित व सक्षम होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, राज्य महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांनी महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन बचत गटांचे सक्षमीकरण करावे असे आवाहन केले. तसेच बचतगटांसाठी समुपदेशन केंद्र व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी दिले.
यावेळी प्रज्वला समितीच्या शालाखा साळवी यांनी महिलांसाठी असणाऱ्या विविध योजना, अधिकार व कायदेविषयक सविस्तर माहिती उपस्थित महिला बचत गटांना दिली. प्रास्ताविक महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. भारती दिगडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.