सांगली : लोकसभा निवडणूक 2019 साठी गुरूवार, दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सांगली मतदारसंघासाठी सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, मिरज गोडाऊन नं. 13 डी, जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे, मिरज येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती पूर्वतयारी काटेकोरपणे करून, मतमोजणीसाठी दिलेली कामगिरी चोखपणे बजावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकसभा निवडणूक 2019 च्या मतमोजणी पूर्वतयारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे दि. 16 मे रोजी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तसेच, दि. 22 मे रोजी मतमोजणीची रंगीत तालिम घेण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दि. 23 मे रोजी मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांनी सकाळी ठीक 6 वाजता उपस्थित राहावे.
निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सुरक्षा कक्ष ठीक 7 वाजता उघडण्यात येईल. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. ठीक 8 वाजता टपाली मतमोजणी सुरू करण्यात येईल. त्यानंतर ठीक अर्ध्या तासानंतर कंट्रोल युनिटमधील मतमोजणी सुरू करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय यादृच्छिकरीत्या निवडलेल्या (रँडमली सिलेक्टेड) 5 व्हीव्हीपॅट स्लीप मोजणी करण्यात येईल.चौधरी म्हणाले, 44 सांगली लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. टपाली मतमोजणी 10 टेबलवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी निरीक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित असेल. याशिवाय अन्य आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.चौधरी म्हणाले, मतमोजणीचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. तसेच, फेरीनिहाय मतमोजणीची माहिती ध्वनीक्षेपकावरून जाहीर केली जाणार आहे. मतमोजणी कक्षात डिजीटल स्क्रीन लावण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश करता येणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोणत्याही व्यक्तिस मतमोजणी कक्षात भ्रमणध्वनी (मोबाईल) व इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. चौधरी म्हणाले, मतमोजणीसाठी संगणक, इंटरनेट सुविधा, आवश्यक विद्युत सुविधा, विद्युत जनित्र (जनरेटर), अग्निशमन, ध्वनीक्षेपक आदि सुविधा, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पेयजल, मतमोजणीच्या ठिकाणची स्वच्छता, प्रसारमाध्यम कक्ष व त्यासाठी आवश्यक सुविधा, वैद्यकीय पथक आदि बाबींबाबत संबंधित विभागांनी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. तसेच, मतमोजणीची प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.चौधरी म्हणाले, मतमोजणी कक्षात प्रवेशासाठी उमेदवार त्याचा प्रतिनिधी नेमू शकतो. मात्र, त्याचे वय किमान 18 वर्षे असावे. व त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज व छायाचित्र 7 दिवस आधी द्यायचे आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी मतमोजणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.