फोटो ओळ : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपतराव पवार, प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, डाॅ. किरण पराग, ॲड. संदेश पवार आदी उपस्थित होते.
आळसंद : जिल्ह्यात चारा टंचाईवर विविध उपाय शोधले जात आहेत. परंतु बलवडीच्या उगम फाउंडेशने लोकसहभागातून चारा टंचाईवर मात करण्यासाठी 'छावणीमुक्त महाराष्ट्र' हे अभियान हाती घेतले आहे. त्यास प्रशासकीय पातळीवर सर्वाेतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
बलवडी भा. (ता. खानापूर) येथील क्रांतिस्मृतीवनात उगम फाउंडेशनतर्फे ‘छावणीमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत आयोजित वैरण उत्पादन व साठवणूक प्रकल्पाचा प्रारंभ व कामगार नेते भगवानराव भिंगारदेवे प्रवेशद्वार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. चौधरी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून आलो. तेव्हापासून संपतराव पवारांचे सामाजिक कार्य परिचित झाले. दुष्काळी व सुकाळी भागातील जनावरांसाठी शाश्वत चारा देणे आवश्यक आहे. यासाठी छावणीमुक्त महाराष्ट्र प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे. तो यशस्वी झाला, तर राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
संपतराव पवार म्हणाले, क्रांतिस्मृतीवनच्या माध्यमातून हाती घेतलेला प्रत्येक प्रकल्प लोकसहभागातून यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी वैरण उत्पादन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे.
यावेळी प्रातांधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, भाई संपतराव पवार, सरपंच प्रवीण पवार, कलावती भिंगरादिवे उपस्थित होते. यावेळी डॉ. किरण पराग , प्रा. गोरखनाथ किर्दत यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. संदेश पवार यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. आभार प्रा. अनिल पाटील यांनी मानले.