लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील एक हजार ५४० पाण्याच्या नमुन्यांपैकी ११० गावांमधील १५५ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित पाण्याबाबत ग्रामपंचायती गंभीर नसल्यामुळे वारंवार त्याच त्या गावांमधील पाण्याचे नमुने दूषित येत आहेत, ही गंभीर बाबत असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. दूषित पाण्यामुळेच बहुतांशी आजाराशी लोकांना सामना करावा लागत असल्याचेही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रुग्णाला दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने अखेर रुग्णाला सलाइन लावण्याची वेळ येते. दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. टायफाइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगाविण्याची भीती असते. दूषित पाण्यामुळे एवढे गंभीर आजार होत असूनही ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही फारसे गंभीर दिसत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.
तालुकानिहाय आढावा
तालुका पाण्याचे घेतलेले नमुने दूषित नमुने
आटपाडी १,२३ ७
जत २२३ २०
क.महांकाळ ९६ ५
मिरज २२० ४२
तासगाव १३५ २२
पलूस ३४ २
वाळवा १९४ १४
शिराळा १७१ १२
खानापूर २१३ १२
कडेगाव १३० १९
एकूण १५४० १५५
चौकट
शहरातील २४० पैकी ५८ नमुने दूषित
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील पाण्याचे रोज आठ नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. जून महिन्यात २४० पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यापैकी ५८ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले होते. या ठिकाणी महापालिका आरोग्य विभागाने पाणी शुद्धकरणासह दूषित पाण्याबाबत खबरदारी घेण्याच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या आहेत.
चौकट
कोरोनामुळे तीन महिन्यांत नमुने घटले
जिल्ह्यात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा कमी ठेवली होती. यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमधून पाण्याचे नमुने घेण्याची संख्याही ५० टक्क्यांनी घटली होती. जून महिन्यात मात्र एक हजार ५४० पाण्याचे नमुने घेतले आहेत. यापैकी चक्क ११० गावांमधील १५५ गावांमधील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
चौकट
शहरातील ५८ नमुने दूषित
- किती ठिकाणीचे नमुने घेतले : २४०
- नमुने दूषित आढळले : ५८
- चांगले आढळलेले नमुने : १८२
कोट
दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो, म्हणून नागरिकांनी पावसाळ्यात पाणी उखळून थंड करून पिणेच योग्य आहे, तसेच दूषित पाणी होणार नाही, याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. पूरग्रस्त भागामधील ग्रामपंचायतीने टीसीएल, त्रुटीचा वापर करणे गरजेचे आहे.
-डॉ.मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.