सांगली : संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली. प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्यांच्या भरतनाट्यम् नृत्याने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी उपस्थिती लावल्याने कृष्णाकाठावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्याला दि. ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सांगली परिसरातील महिला मंडळांनी एकत्र येऊन भगवान बाहुबलींची भक्ती व आराधना करण्यासाठी बुधवारी कृष्णा तिरावर वसंतदादा पाटील स्मारकाशेजारी भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थित महिला प्रतिनिधींच्याहस्ते कलशामध्ये धान्य भरून संध्येची सुरुवात करण्यात आली. या संध्येसाठी १००८ महिलांचा सहभाग अपेक्षित होता, तथापि शहरासह परिसरातील विविध महिला मंडळांच्या हजारो सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे एकाचवेळी भगवान बाहुबली यांची भक्तिगीते गायकांकडून सादर होत होती, तर त्याचवेळी राजनेमी नृत्य कला अॅकॅडमीच्या संचालिका धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या भरतनाट्यम् नृत्य सादर करत होत्या, तर दुसरीकडे कलाविश्व महाविद्यालयातील २५ विद्यार्थी एकाचवेळी भगवान बाहुबली यांचे देखणे चित्र रेखाटत होते. पार्श्वनाथ भक्ती आराधनातर्फे सोनाली देसाई-चौगुले यांनी भक्तिगीते सादर केली. सुरुवातीला प्राकृत भाषेतील गोमटेश स्तुती सादर करण्यात आली. त्यानंतर बाहुबली स्वामी स्तवन सादर करण्यात आले. ‘जय गोमटेश जय गोमटेश, जय बळगोळके जय गोमटेश’ हे स्तवन यावेळी सादर झाले. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, शैलजा नवलाई, कांचन कांबळे, कांचन पाटील, नीता केळकर, शैलजाभाभी पाटील, जयश्री पाटील, मीनाक्षी पाटील, अनिता पाटील, चांदणी आरवाडे, राजश्री कांते, जयवंती पाटील, स्वरूपा पाटील, सुनंदा पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. गुलाबी रंगाने कृष्णाकाठ रंगलाभक्तिसंध्या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान कराव्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व महिला गुलाबी रंगाची साडी परिधान करून हजर होत्या. एकाचवेळी हजारो महिला भक्तिसंध्या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
भगवान बाहुबली भक्तिसंध्येने सांगलीकर मंत्रमुग्ध! कृष्णा तिरावर चित्र, नृत्य, गायनाचा अनोखा संगम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 8:22 PM