कामेरी : ‘भैरुबाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात कामेरीचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेस गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. गुरुवारी पहाटे पुजारी अशोक निळकंठ यांच्याहस्ते भैरवनाथाच्या मूर्तीस अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी बारा वाजता बगाडाचे पूजन करून फेर्यांना सुरुवात झाली. यावेळी भाविकांची गर्दी लोटली होती. शामराव पाटील (अण्णा), सुनील पाटील, अध्यक्ष मनोज पाटील, धनाजी पाटील, पोलीसपाटील बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बगाडाचे पूजन करण्यात आले. नेटक्या संयोजनामुळे दुपारपासून भैरवनाथ मंदिर ते हनुमान मंदिर मार्गावर यात्रेचे मुख्य आकर्षण असणार्या बगाडाच्या फेर्या काढण्यात आल्या. सायंकाळी पाचला खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते बगाडाची फेरी काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत सुनील पाटील, काशिनाथ निंबाळकर, सयाजी मोरे, अभिषेक पाटील बगाडावर बसले होते. त्याचबरोबर राजेंद्र पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, अशोक जाधव यांच्याहस्ते बगाडाच्या फेर्या काढण्यात आल्या. बगाडास भेट देण्यासाठी आलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक, ‘कृष्णा’चे अध्यक्ष अविनाश मोहिते, खासदार राजू शेट्टी यांची ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढली. यात्रा यशस्वी करण्यासाठी सुकाणू समितीसह अनेकांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
कामेरीच्या बगाडास भाविकांची अलोट गर्दी भैरवनाथ यात्रा : ग्रामस्थांचे नेटके संयोजन
By admin | Published: May 09, 2014 12:16 AM