आॅनलाईन लोकमतवारणावती, दि. २८ : आरळा येथील रस्ता रुंदीकरण काम त्वरित सुरु करावे, यासाठी ग्रामस्थांनी पाचव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. पाचव्या दिवशी सोनवडे येथील जोतिर्र्लिग भजनी मंडळाने भजनाचे कार्यक्रम करुन आंदोलकांना पाठिंबा दिला.
दिवसभरात काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, पंचायत समितीचे विद्यमान सभापती मायावती कांबळे, सदस्य पी. वाय. पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी सदस्य सर्जेराव पाटील, विश्वास सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र नायकवडी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
आरळा येथील ग्रामस्थांनी २३ पासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही ठोस निर्णय अथवा आश्वासन दिलेले नाही. आंदोलनाची दखलही कोणी घेतलेली नाही. याचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरळा गाव तसेच भाष्टेवाडी, येसलेवाडी, भाडुगळेवाडी, बेरडेवाडी, कोकणेवाडी, भाष्टे वस्ती, इनामवाडी, सिध्दार्थनगर, चांदोलीवाडी, या वाड्या व वस्तीवर लोकांना प्रबोधन करुन जनजागृती केली जात आहे.