भिलवडी : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील गाव व कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलवडी ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी तब्बल पंधरा वर्षांनंतर सत्तांतर झाले. सतरापैकी अकरा जागांवर भाजप-राष्ट्रवादीप्रणित महाआघाडीने वर्चस्व प्राप्त केले आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींना गावाने मोठा धक्का दिला आहे. भिलवडीचे नेते बाळासाहेबकाका पाटील यांचे चिरंजीव राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस आनंदराव मोहिते, माजी सरपंच शहाजी गुरव, डी. सी. पाटील, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब मोहिते, मोहन तावदर, बाबासाहेब मोहिते यांनी कॉँग्रेसप्रणित ग्रामविकास खंडोबा पॅनेलच्या माध्यमातून सतरा जागांवर दिग्गज उमेदवार मैदानात उभे केले होते. माजी सरपंच विजयकुमार चोपडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, धनंजय पाटील, सुरेंद्र वाळवेकर, क्रांती कारखान्याचे संचालक महावीर चौगुले, तानाजी भोई, श्रीकांत निकम, मनीष कुलकर्णी आदींच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादीप्रणित सर्वपक्षीय महाआडीच्या माध्यमातून तगडे उमेदवार देऊन मोठे आव्हान निर्माण केले होते. सत्ताधाऱ्यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली, तर विरोधकांनी भिलवडीची अपूर्ण राहिलेली पाणीपुरवठा योजना, विकासकामातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचे प्रतिआव्हान निर्माण केले होेते. चोपडे गल्ली, मगदूम गल्ली, ऐतवडे गल्ली या तीन प्रभागात असलेल्या जैन मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता कॉँग्रसचे नेते संग्राम पाटील यांनी भिलवडीचा पहिला सरपंच जैन समाजाचाच करणार असल्याची घोषणा करीत ही निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वच समाज एकत्रित येऊन परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले. ग्रामपंचायतीत कॉँग्रेसचा पंधरा वर्षांनंतर पाडाव झाला असून, भाजपचा मतांचा टक्काही वाढला आहे. (वार्ताहर)दिग्गज नेते आणि लक्षवेधी लढतीयंदा सरपंचपद खुल्या गटासाठी आहे. व्यापारी संघाचे रमेश पाटील मैदानात उतरल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील यांना मैदानात उतरावे लागले. कॉँग्रेसचे डी. सी. पाटील यांच्याविरोधात नव्याने मैदानात उतरलेले युवक नेते सुरेंद्र वाळवेकर या लढती लक्षवेधी झाल्या. यामुळे यंदाच्या निवडणुकीत जान आली होती. संग्राम पाटील, सुरेंद्र वाळवेकर, विजयकुमार चोपडे, धनंजय पाटील आदी दिग्गज निवडून आले आहेत.
भिलवडीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला!
By admin | Published: November 03, 2015 11:12 PM