सांगली : कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटना व जिल्हा पानपट्टी असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. यादिवशी पानपट्टी व भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
भाजीपाला विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर म्हणाले की, आठ डिसेंबर रोजी भारत बंद असून सांगली जिल्ह्यातील भाजी विक्रेत्यांनी त्या दिवशीच्या पहाटे कोणत्याही परिस्थितीत भाजी खरेदी-विक्री व्यवहारात उतरू नये. सोमवारी दिवसभरात आपल्याकडील भाजीपाला संपवावा आणि नव्याने एक दिवस शेतीमाल घाऊक बाजारातून खरेदी करू नये, शेतकऱ्याला काढायला सांगू नये. महापालिका क्षेत्रात मंगळवारचे सर्व बाजार बंद ठेवण्यात येतील. यादिवशी भाजीपाला विक्रेत्यांनीही सांगलीत येऊ नये, असे आवाहन काटकर यांनी केले.
पान असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी म्हणाले की, शेतकरीविरोधी कृषी कायदा रद्द करा, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनास सांगली जिल्हा पान असोसिएशनचा पाठिंबा असून मंगळवारी सर्व पान दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, युसूफ जमादार, एकनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.